मुंबई : कोरोना विरोधात केंद्रासहीत सर्व राज्य एकत्रित लढा देत आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नियमित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या संकटात सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्ष देखील एकत्र आला आहे. राष्ट्र विरोधी संकट उभं ठाकलं असेल तर राजकारण एका बाजुला याचे उदाहरण आज पाहायला मिळाले. कोरोना विरोधात लढण्यासाठी भाजपा राज्य सरकारसोबत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी मुख्यमंत्र्यांशी आज दूरध्वनीवर चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे आश्र्वस्त केले. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. 


राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत असे फडणवीस म्हणाले. रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याबाबत त्यांना अवगत केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 



राज्यात ८१ कोरोना बाधित 


आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत ५७, पुण्यात ६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, नगरमघ्ये ९, ठाण्यात ५ तर बुलढाण्यात १ रुग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४१६ वर गेला आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला तर ४२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.