दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरु होतंय. शेतक-यांच्या मुद्यावरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजप शिवसेनेवर तोंडसुख घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोट्यवधी रुपये खर्च करून 'मी लाभार्थी' या जाहिराती सरकारनं केल्या. पण या जाहिराती खोट्या आहेत. आमच्या सरकारनं केलेल्या कामाचं श्रेय हे सरकार घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली. 


कर्जमाफीवरूनही टीका 


सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 89 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याची घोषणा केली. पण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप विखेंनी केला आहे.


कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावं सरकारनं वेबसाईटवर टाकावीत, असं आव्हान विखे पाटील यांनी फडणवीस सरकारला केलं आहे. तसंच सरकारच्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.


धनंजय मुंडेंचीही टीका


दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीका केली. फडणवीस सरकारची तीन वर्षांची राजवट अन्यायकारक आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले.


शेतकरी कर्जमाफीची मुख्य लाभार्थी इनोव्हव कंपनी आहे. याच कंपनीला ऑनलाईन कर्जमाफीचं काम दिलं होतं, असा आरोप मुंडेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर शेतकरी संख्या आणि रक्कम जाहीर केली. सरकारनं विधीमंडळात कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.