पाण्यासाठी बळीराजाची मध्यरात्री वणवण...
शेतकऱ्याची सारी जिंदगीच बेभरवशाची, अमाप कष्टाची अन् सदोदीत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची...
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : 'अंधार फार झाला,पणती जपून ठेवा' अशा एका कविच्या पंक्ती शेतकऱ्यांसाठी मात्र 'अंधार फार झाला, जीव जपून ठेवा' याप्रमाणे वास्तवात अनुभवाव्या लागत आहेत.
नाव बळीराजा असलं तरी पावला-पावलावर त्याची जिंदगी जोखीमभरी अशीच आहे.कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचं पाठ सोडत नसलेलं रहाटगाडगं... तर कधी पडत्या पावसातील अन् महावितरणच्या विजेचा धोका... कधी नापिकी तर कधी बाजारात बेभाव व्हावे लागणं... त्यांची सारी जिंदगीच बेभरवशाची, अमाप कष्टाची अन् सदोदीत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची...
यंदा परतीच्या पावसामुळे रबी हंगामाच्या सिंचनाकरीता थोडंफार पाणी उपलब्ध आहे. आसमानी संकट थकले असल्याचे सुखद चित्र दिसत असतानाच सुलतानी संकट मात्र इथेही पुढं ठाकलं आहे. कारण, आहे त्या पाण्याने पिके सिंचित करायची म्हटलं तर मायबाप सरकार वीज देतंय ते रात्रीला. यामुळे कडाक्याच्या हाड गोठवणाऱ्या, अगदी पाच सात अंश सेल्सीअसपर्यंत पारा घसरलेल्या स्थितीत, रस्त्यावरील विंचू-काट्याचा, फुत्कारणाऱ्या सापांचा, अस्ताव्यस्त परसलेल्या महावितरणच्या विद्यूत धोक्याचा मुकाबला करत शेतकऱ्याला सिंचनाकरीता केवळ रात्रीतच वीज पुरवठा मिळत असल्याने रात्र जागून काढावी लागत आहे.
असंच ७० वर्षीय शहाजी सावंत यांनाही रात्र जागून काढत आपल्या पिकांना जगवण्याची वेळ आली आहे. रात्री १२ वाजता लाईट येते मग तेच साप, इंचू, काटे असलेली वाट तुडवत सावंत आपल्या शेताकडे छोट्याश्या बॅटरीच्या साहायाने जातात. महाभयंकर volt असलेल्या दिपीमधून अंधारातच बोअर आणि विहिरीचं पाणी चालू करतात. अशी जीव घेणी करामत त्यांना रोजच करावी लागते. या शहाजी सावंतसोबत झी चोवीस तासचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा रात्री १२.३० वाजता त्यांच्या शेतात गेले. सावंत यांचा रात्रक्रम सगळ्यांसमोर यावा यासाठी थेट शेतातून रात्री १२.३० वाजता फेसबुक लाईव्ह करून परिस्थितीचा आढावा घेतला.
हे फेसबुक लाईव्ह ३,५५,८१४ लोकांपर्यंत पोहोचलं आहे. तसेच आतापर्यंत १३२ हजार लोकांनी हे फेसबुक लाईव्ह पाहिलं आहे. १२ तासांच्या आत ५५३ लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एवढंच नव्हे तर या फेसबुक लाईव्हमध्ये अनेकांनी कमेंट करून 'zee24taas.com' चे आभार देखील मानले आहेत. ज्यावेळी आपण अगदी शांत झोपत असतो त्यावेळी आपला बळीराजा शेतात काम करण्यासाठी जातो. ही गोष्ट या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आली आहे.
पती रात्री या वयात शेतात पाणी द्यायला जातात म्हणून रात्रभर सावंत यांच्या पत्नी सुनंदा बाई जागूनच काढतात. त्या म्हणतात की,'जोपर्यंत त्यांचे पती घरी परतत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवाला घोर लागते. कधीकधी पतींना मदत करण्यासाठी आपणही त्यांच्या सोबत जातो,' असही त्या सांगतात. त्याचबरोबर 'शेतकरी होणं सोप्प नसत' असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
'हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात,
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला'
गोठवणारी थंडी, पावला-पावलावर असणारा जीवाला धोका या भयान स्थितीत त्यांला 'दारी धरा अन् मरा' असा संदेश तर व्यवस्था देत नाही ना असा प्रश्न पडतो... हा प्रश्न काल-परवाच्या सरकारात ही होता अन् आजच्या 'ठाकरे' सरकारतही आहे. यामुळे एकीकडे शहरी झगमगाटासाठी, सुरक्षेची सर्व मानकं पाळणाऱ्या उद्योगासाठी अहोरात्र वीज उपलब्ध असताना बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी 'रात्रीस खेळ चाले' वारंवार का यावे हे मोठे वेदनादायी आहे.