लातूर : लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी झालेत. या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैंकी ५२६ मतं सुरेश धस यांना मिळाली तर जगदाळेंना ४५२ मतं मिळाली... २५ मतं बाद ठरवण्यात आली तर एका मतदाराने 'नोटा' अधिकार वापरत मतदान केलं. सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांचा ७६ मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत बाजी मारलीय. 


बंद दारवाजाआड मतमोजणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मंगळवारी मतमोजणी दरम्यानही अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यात बाचाबाची झाली. बाद मतांवरून तहसील कार्यालयातच या दोघांची जुंपली. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद थांबवला... त्यानंतर पत्रकारांना बाहेर काढून बंद दरवाजाआड मतमोजणी पार पडली.


निकाल अमान्य - जगदाळे


मात्र, हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं म्हणत अशोक जगदाळे यांनी मतदान फेरमोजणीची मागणी केलीय. काँग्रेसने विश्वासघात केला... आमच्यासोबत राहून भाजपला मदत केली, असा थेट आरोप पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी केलाय. 


काँग्रेस-राष्ट्रवादीतली तेढ 


जवळपास दीडशे मतं कमी असतानाही भाजपच्या सुरेश धस यांचा विजयी हा पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला बळ देणारा आहे


. तर दुसरीकडे आधी रमेश कराड यांनी शेवटच्या क्षणी दिलेला दगा आणि आता जगदाळे यांचा पराभव हा धनंजय मुंडे यांना मोठा फटका मानला जातोय. सुरेश धस यांनी मोठी आघाडी घेत राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केल्याने काँग्रेस - राष्ट्रवादी मधली तेढ अधिक स्पष्ट झाली आहे.


राष्ट्रवादीने भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये आलेले रमेश कराड यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत विरोधकांनी भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं होतं. 


धनंजय मुंडेंना धक्का 


धस विरुद्ध जगदाळे या लढतीत खरी प्रतिष्ठा पणाला लागली होती ती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बंधु-भगिनींची... धस यांच्या विजयामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसलाय. 


२१ मे रोजी झालेल्या या निवडणुकीत मतदानानंतर तब्बल २१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज निकाल पार पडलाय. प्रशासनानं १००४ मतांची मोजणी करण्यासाठी  तहसील कार्यालयात पाच टेबलांची व्यवस्था केली होती.