ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, उस्मानाबाद :  नावात काय आहे, असं आपण सहजपणे म्हणतो. पण सध्या उस्मानाबादमध्ये नावावरूनच चर्चा रंगलीय. इथं ज्याच्या त्याच्या तोंडी राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोनच नावं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्माबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील चिंचोली गावातील दत्ता चौधरींच्या मोठ्या मुलाचं नाव राष्ट्रपती असं आहे, त्यात आता पंतप्रधानांची भर पडलीय. चौधरींच्या घरात नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या मुलाचा जन्म झाला असून या मुलाचं नाव त्यांनी चक्क पंतप्रधान असं ठेवलं आहे. त्यांनी आपल्या मुलांची अजब नावं ठेवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. त्यामुळे आता एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान खेळताना, बागडताना दिसणारेत. 


राजकीय नेतेमंडळी, अभिनेते, अभिनेत्रींचं नाव देण्याचा कल आपल्याकडे आहे. पण दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या मुलांची देशातील सर्वोच्च पदाची नावं ठेवण्याचा निर्णय घेतला. नावाचा मुलांच्या कर्तृत्वावर प्रभाव पडतो, त्यामुळे माझ्या मुलांवर चांगले संस्कार करुन त्यांना नावाप्रमाणे बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं दत्ता चौधरी यांचं म्हणणं आहे. 



अलिकडच्या काळात नव्यानं जन्मलेल्या बाळांची हटके नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू झालाय. बरेच जण आपल्या मुलांना सिनेकलाकारांची नावं देतात. पण चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेऊन नवा पायंडा पाडलाय.आता या मुलांनीही भविष्यात नावाला साजेशी कामगिरी करावी हीच अपेक्षा.