किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका विविध घटकांवर बसू लागला आहे. याच कोरोना व्हायरसचा फटका आता औद्योगिक क्षेत्रावर होऊ लागलाय. त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटन, धार्मिक स्थळ, पोल्ट्री व्यवसायाबरोबरच औद्योगिक क्षेत्रातही कोरोनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसू लागलाय. नाशिक नगरीत असलेल्या महिंद्रा आणि बॉश या मोठ्या कंपन्यांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना फटका बसू लागल्याचं चित्र आहे. चीनवरून येणाऱ्या मटेरिअलचा तुटवडा पडू लागल्याने काम थांबवलं जात आहे. महिंद्रासारखी मोठी कंपनी आठ दिवसांसाठी बंद होती. तर त्यावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना इन आऊट देण्यात आले होते. कोरोना व्हायरसमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जाणवू लागल्याने अनेकांना धक्का बसलाय.


कोरोना व्हायरसमुळे कंपन्यांची वाट लागलेली आहे. नाशिक शहरातील मोठ्या कंपन्यांना बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. चीनसारख्या मोठ्या देशातून येणाऱ्या कच्चामाल, जे मटेरियल आहे ते भारतात येत नाही. त्यामुळे कंपन्यांना काम थांबवावं लागतंय. आयटी सेक्टरमध्ये असलेले अनेक लोक घरी बसून काम करतात. मात्र कामगार वर्गाला थेट काम करावं लागतं. यामुळे देखील मनात काहीशी भीती आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीती असून कंपनी उत्पादनावर देखील याचं मोठं सावट आहे. मात्र, सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. कंपनी याबाबत जनजागृती करत असल्याचं, कामगारांनी सांगितलं आहे.


कोरोनामुळे कोट्यवधी रुपयांच नुकसान होणार आहे. तर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोबतच इन आऊटमुळे आणि कोरोनामुळे कामगार वर्ग धास्तावला आहे. परदेशातून येणारा कच्चा माल कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाल्याने अनेक कंपन्यांचं कंबरडं मोडणार आहे. शिवाय त्याचा थेट परिणाम कामगार वर्गासोबत अर्थव्यस्थेवरही होणार आहे.