चंद्रपूर: जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील ख्यातनाम धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. बंग यांच्या शोधग्राम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली ३ वर्षे त्याच्यावर ओढविलेल्या पक्षाघाताच्या आजारासंबंधात त्यांचेवर उपचार सुरु होते. रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या मूळ गावी त्यांच्यावर आज (सोमवार, ४ जून) दुपारनंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादाजी रामाजी खोब्रागडे हे निम्म्या भारतात रोजच्या जेवणाच्या ताटात असणाऱ्या तांदूळ या आवडत्या अन्नाच्या ९ वाणांचे संशोधक होते.  यांच्या नावावर ९ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. शाळेच्या तीसऱ्या इयत्तेपर्यंत शिकलेले दादाजी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी आपल्या वडिलांसह थोड्याशा शेताच्या तुकड्यावर पारंपरिक शेती करत असत. कुटुंबातील वाढत्या जबाबदाऱ्यांनी शेतजमीन विक्रीस काढली गेली आणि दादाजींकडे केवील दीड एकराचा तुकडा शिल्लक राहिला. या दीड एकराच्या तुकड्यात त्यांनी ८० च्या दशकापासून धानाचे विविध वाण विकसित करण्यासाठी त्यांनी आपली शक्ती खर्च घातली. ९ धानाचे वाण स्वतःच्या नावे असलेला संशोधक आलिशान आयुष्य जगला असता मात्र दादाजींनी आपल्या ज्ञानाचा फायदा स्वतःपर्यंत कधीच ठेवला नाही.


चंद्रपूर, विदर्भ असो वा राज्य आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आपले संशोधन मुक्तहस्ते दिले. त्यांनी १९८३ साली विकसीत केलेली HMT ही धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. सामान्यातून आलेल्या या धान संशोधकाची ३ वर्षांपूर्वी लकवाग्रस्त झाल्याने बिकट अवस्था झाली होती. धान शेत नापिकी झाल्याने या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली होती. आपले ज्ञान उदारपणे लोकांना वाटणाऱ्या दादाजींना आयुष्याच्या उत्तरार्धात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. प्रकृती अधिक बिघडल्याने दादाजींना ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मदत व्हावी यासाठी देशभर सोशॅम मीडियावर अभियान सुरु होते. तर सत्ताधारी भाजपने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्याना शासकीय मदत देऊ केली होती. प्रकृतीत सुधार होण्यासाठी त्यांना गडचिरोलीच्या डॉ. बंग दाम्पत्याच्या शोधग्राम येथे दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.