वाशी : पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेनं वाशीजवळ आंदोलन केलं. करणी सेनेच्या या आंदोलनामुळे एक्स्प्रेस हायवेवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. २५ तारखेला पद्मावत हा चित्रपट रिलीज होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्सालींच्या विरोधात घोषणाबाजी केली तसंच टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पद्मावत चित्रपटाला सेन्सर बोर्डानं हिरवा कंदील दिल्यापासून करणी सेनेनं देशभरात आंदोलन सुरु केली आहेत. गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारनं या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता पण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर या चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.



करणी सेनेनं स्वीकारलं भन्सालींचं निमंत्रण


रिलीजआधी चित्रपट बघण्याचं संजय लीला भन्सालींचं निमंत्रण राजपूत करणी सेनेनं स्वीकारलं आहे. पद्मावत चित्रपट बघायला आम्ही तयार आहोत. हा चित्रपट बघणार नाही असं आम्ही कधीच म्हणलो नव्हतो. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनींगला आम्हाला बोलावलं जाईल, असं आश्वासन निर्मात्यांनी आम्हाला दिलं होतं, असं करणी सेनेचे लोकेंद्र सिंग कालवी म्हणाले आहेत.


राजपूत करणी सेना आणि राजपूत सभा जयपूरला २० जानेवारीला भन्साली प्रोडक्शननं चित्रपट बघण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्यामध्ये कोणताही प्रेम प्रसंग दाखवण्यात आलेला नाही, असं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं होतं.


करणी सेनेच्या प्रमुखांनी घेतली योगींची भेट


राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आणि उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट रिलीज झाला तर चित्रपटगृहात जनता कर्फ्यू लावेल, असा इशारा करणी सेनेनं दिला आहे. या चित्रपटामधल्या ४० गोष्टींवर आम्हाला आक्षेप असल्याचं कालवी म्हणाले.