पालघर : राज्यातल्या मतदारांनी पोटनिवडणुकीकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. पालघरमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे ४६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड वगळता जिल्हयामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणूकीतील ७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झालंय. तर भंडारा गोंदियात पाच वाजेपर्यंत ३८.६५ टक्के मतदानाची नोंद झालीय.  त्यामुळं मतदारांचा निरुत्साह दिसून आलाय. गेल्यावेळी भंडारा-गोंदियात ७२ टक्के तर पालघरमध्ये ६३ टक्के मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रात व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. दोन्ही ठिकाणी ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.


भंडारा-गोंदियामध्ये पुन्हा मतदानाची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रांचा गोंधळ दिसून आला. या गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. सकाळपासून ६० ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दूर करण्यात आले. 


मतदान यंत्राच्या गोंधळामुळे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केलीय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही फेर मतदानाची मागणी केलीय. भंडारा-गोंदियामध्ये २१०० पैकी साडेचारशे ईव्हीएम बंद पडल्याची माहिती मिळालीय. ही संख्या मोठी असल्याने इथं पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीय. 


२०१४मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करुन खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटले यांच्यात जागेसाठी चुरस आहे.


शिवसेनेची मागणी फेटाळली 


पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावली. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र सहा वाजेपर्यंत रांगेत जेवढे मतदार असतील त्यांना मतदान करू दिलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक मतदारांना निराश होऊन माघारी जावं लागलं. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली.