अखेर, पालघर पोटनिवडणुकीत असा रंगतोय चौरंगी सामना
श्रीनिवास वनगांना शिवसेनेनं उमेदवारी देऊन भाजपाला शह दिला असताना काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन भाजपानं रिंगणात उतरवलंय.
पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीची रंगत वाढलीय... श्रीनिवास वनगांना शिवसेनेनं उमेदवारी देऊन भाजपाला शह दिला असताना काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन भाजपानं रिंगणात उतरवलंय. भाजपचे खासदार चिंतामण वनगांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता रंगत आलीये... चार दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले वनगांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला... चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपानं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला होता... हाच धागा पकडून शिवसेनेनं भाजपावर शरसंधान करत त्यांना उमेदवारी दिली...
त्यानंतर दुपारी भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि लगोलग उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
या जागेसाठी श्रीनिवास वनगांच्याच नावाचा विचार सुरू होता. मात्र शिवसेनेनं त्यांना अचानक प्रवेश देऊन आणि नंतर भूमिगत ठेवून राजकारण खेळल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
राजेंद्र गावित भाजपामध्ये गेल्यामुळे आता काँग्रेसकडून तिकिट मिळण्याचा दामोदर शिंगडांचा मार्गही मोकळा झालाय... तर वसई-विरार भागात वजन असलेली बहुजन समाज पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाकडून बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आलीये...त्यामुळे पालघरमध्ये चौरंगी सामना रंगणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्तानं तब्बल तीन दशकांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पहिल्यांदाच रंगणार आहे. तर पालघरमध्ये पुन्हा एकदा वनगा विरुद्ध गावित अशीच लढत रंगणार असली तरी त्यांचे पक्ष मात्र बदलले आहेत... पालघरची जनता कुणाला कौल देणार? ते ३१ मे रोजी कळेलच पण नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षांतर केलं की जनतेच्या विकासासाठी? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.