पालघर हत्याकांड: त्या दिवशी गावात नेमकं काय घडलं?
गाडीतील प्रवासी गाडीचे डोअर लॉक करून बसले होते.
मुंबई: सध्या राज्यभरात गाजत असलेल्या पालघर हत्याकांडासंदर्भात दररोज नवनवी माहिती समोर येताना दिसत आहे. येथील गडचिंचले गावात जमावाने दरोडेखोर समजून दोन साधू आणि गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे (CID) सोपवला होता.
पालघर प्रकरणी राजकारण नको; मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
यानंतर पालघर हत्याकांडाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'झी २४ तास'ने गडचिंचले गावाच्या सरपंच चित्रा चौधरी यांच्याशी संवाद साधला. चित्रा चौधरी या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
पालघरचे हत्याकांड कोणी घडवले नाही ना?, शिवसेनेचा सामनातून निशाणा
गावात मोठा जमाव जमला असून काही प्रवाशी लोकांना मारहाण केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चार- पाचशे लोकांचा जमाव तेथे जमला होता. चोर आहेत आणि पोरं पळवायला आलेत, असे सांगत गावकरी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते.
परंतु गाडीतील प्रवासी गाडीचे डोअर लॉक करून बसले होते. आपण त्यांना नाव विचारले पण त्यांनी दरवाजे काही उघडले नाही. यानंतर चिडलेल्या जमावाने त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरु केली. तेव्हा मी जमावाला रोखले.
यानंतर आम्ही साधूंना चौकीत आणून बसविले. पोलीस येईपर्यंत तीन तास या प्रवाशांना आपण जमावापासून वाचविले. त्यावेळी जमावाने आपल्यालाही शिवीगाळ केली आणि मारण्याच्या धमक्या दिल्या. पोलीस आल्यानंतर त्या प्रवाशांना पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर मी चौकीच्या मागच्या दाराने घरी गेले. मात्र, काहीवेळातच पोलीस मला पुन्हा बोलवायला घरी आले. यानंतर मी पुन्हा घटनास्थळी गेले तेव्हा जमावाने पोलिसांदेखत तिन्ही व्यक्तींची हत्या केली. हा प्रकार पाहून मी खूपच भयभीत झाल्याचे चित्रा चौधरी यांनी सांगितले.