हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यामधील जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर अद्यापही सोयीसुविधा पोहाचलेल्या नाहीत. अद्याप या गावपाड्यांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने ग्रामस्थांची परवड होत आहे. रस्त्याअभावी आजही रुग्णांना अवघड प्रवास करुन आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आदिवासी पाड्यांवर अद्यापही रस्त्याअभावी आजारी रुग्णांना झोळीत घालून रुग्णालय गाठावे लागत आहे. जव्हार तालुक्यातील भाटीपाड्यातही ग्रामस्थांना असाच त्रास सहन करावा लागत आहे.


भाटीपाडा येथील ४० वर्षीय लक्ष्मी लक्ष्मण घाटाळ या महिलेच्या पायाला मोठी दुःखापत झाली होती. मात्र या गावातून मुख्य शहराकडे जाण्यासाठी रस्ता आणि पुल नसल्याने नदी ओलांडून जावे लागते.  ग्रामस्थांना या जखमी महिलेला झोळीत टाकून वाहत्या काळशेती नदीत उतरून प्रवास करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


गावकऱ्यांनी काळशेती नदीतून १०० मीटरचे अंतर पार करुन जव्हार तालुका गाठला. या भागात  पावसाळ्यात नदीचे पात्र भरून वाहत असल्यामुळे लोकांना डोंगर, टेकड्या चढून मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी ३ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे लवकर आरोग्य सोईसुविधा मिळवण्यासाठी गावकरी नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करत आहेत.



दरम्यान, भाटीपाड्यात एकूण ३५ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. भाटीपाड्यातील नागरिक अनेक वर्षांपून नदीवर पूल आणि रस्त्याची वाट पाहत आहेत. मात्र स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतरही मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अजूनही सोई सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते.