संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ...
दोन वर्ष्याच्या कालावधीनंतर वारकरी आणि विठूरायाची होणार भेट...
सोनू भिडे, नाशिक- पंढरपूरच्या वारीची परंपरा शेकडो वर्ष्यापुर्वीची आहे. मात्र दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट असल्याने हि परंपरा खंडित झाली होती. वारकर्यांची पायी दिंडी दोन वर्ष निघालीच नाही. यामुळे राज्यातील वारकरी आणि विठ्ठलाची भेट होऊ शकली नाही. मात्र या वर्षी या दिंडीला परवानगी देण्यात आली आहे.
सोमवारी त्रंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. आज (१४ जून) सकाळी नाशिककारांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. २० जूनला संत तुकारामांची पालखी तर २१ जूनला आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे.
वारकरी पंथाचे गुरुवैर्य संत निवृत्तीनाथ महाराज सातशे वर्ष्यापुर्वी त्रंबकेश्वर मध्ये समाधिस्थ झाले होते. निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई हे चार भावंड. या भावंडात निवृत्तीनाथ सर्वात मोठे. निवृत्तीनाथांचे थोरले भाऊ नामदेव त्यांना गुरु मानायचे. त्यामुळे आषाढी च्या वारीचा पहिला मान हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना दिला जातो. ती परंपरा आजतागायत सुरु आहे.
सोमवारी (१३ जून) हरिनामाचा गजर, हाती टाळ मृदूंग घेत संत निवृत्तीनाथांचा जयघोष करत नाशिकच्या त्रंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीन पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलय. निवृत्तीनाथांची पालखी संपूर्ण चांदीची आहे. एक कोटी खर्च करून हि पालखी सहा वर्ष्यापुर्वी तयार करण्यात आली आहे. याच पालखीतून निवृत्तीनाथांची प्रतिमा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेली जाते.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या पालखीचा मार्ग
पहिल्या दिवशी त्रंबकेश्वर येथून नाशिकच्या सातपूर येथे पालखीचे आगमन होते. रात्री सातपूर येथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिककर पालखीचे स्वागत करतात. यानंतर पालखी पुढील मार्गाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते.
नाशिक-पळसे-लोणारवाडी-खंबाळे-पारेगाव-गोगलगाव-राजुरी-बेलापूर-राहुरी-डोंगरगन-अहमदनगर-साकत-घोगरगाव मिरजगाव-चिंचोली (काळदाते) कर्जत-कोरेगाव, रावगाव-जेऊर-कंदर-दगडी अकोले-करकंब-पांढरीवाडी-चिंचोली-पंढरपूर.
पालखीला जाऊन येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कलावाधी लागणार आहे दिंडीतील वारकरी मंडळी रोज वीस किलीमिटर पायी प्रवास करत असतात. तर वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्तावीसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते.
असा होतो प्रवास
ठरल्याप्रमाणे पालखीचे २६ मुक्काम होणार आहेत. २७ व्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचेल. ०१ जुलैला पालखीचे कर्जत जवळ धांडे वस्ती येथे उभे रिंगण होईल. त्यानंतर ९ जुलै रोजी वाखरी सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर पंढरपूर प्रवेश सोहळा सुरू होणार आहे. रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रोत्सव असून पालखीचा मुक्काम आषाढ पौर्णिमेच्या १३ जुलैपर्यंत पंढरपुरातच असेल.
यात्रा संपल्यानंतर वारकरी हरिनामाचा गजर करत पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरते. 18 दिवसांचा पायी प्रवास करून ३० जुलैपर्यंत पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होईल.