सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पंढरपुरमध्ये (Pandharpur Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरातील सांगोला (Sangola) येथे अज्ञातांनी एको पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pandharpur Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगोला येथे अज्ञात मारेकऱ्यांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करुन पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वासुद (ता. सांगोला) येथील केदारवाडी रोडवर ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.


पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे वासूद येथे जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले होते. त्यानंतर बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या डोक्यात वार करून खून केला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून चंदनशिवे यांच्या नातेवाईकांनी सूरज यांचा शोध सुरु केला होता. मात्र सकाळी शोध घेत असताना वासूद- केदारवाडी रोडनजीक सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला. सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे 2018 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असताना नऊ कोटींच्या अपहार प्रकरणी निलंबित झाले होते. एका वर्षांपूर्वी चंदनशिवे यांचे निलंबन रद्द झाले होते. त्यानंतर सूरज चंदनशिवे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र आता त्यांच्या हत्यने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.