सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील विठ्ठलाला सोन्याची टोपी घालत असल्याचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल. अगदी तसाच काहीसा प्रकार पंढरपूर (Pandharpur News) मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Sri Vitthal Rukmini temple) दान केलेल्या दागिण्यांच्या बाबतीत घडला आहे. गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठुराच्या चरणी भाविक सढळ हस्ते मोठ्या संख्येने दान करत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांसह दागदागिन्यांचाही समावेश असतो. मात्र आता विठ्ठलाला दान करण्यात आलेले दागिनेच नकली निघाल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्ष भरात लाखो भाविक येत असतात. अनेक जण आपले नवस पूर्ण झाल्याच्या भावनेने रोख रक्कम, सोन्याचे , चांदीचे दागिने दान करत असतात.  देवाची दान पेटी मोजताना यात अनेक प्रकारचे दागिने आढळतात.  या दागिन्यांना सराफाकडून तपासून घेतले जाते. यातील खरे असणारे दागिने व्यवस्थीत बाजूला ठेवले जातात. यात अनेक दागिने सोन्या चांदी सारखे दिसणारे पण त्याला पॉलिश केलेले किंवा बेंटेक्स प्रकारचे आढळले आहेत. अशा नकली दागिन्यांची संख्या एक पोते भरेल इतकी झाली आहे.


या दागिन्यांचा समावेश


या दागिण्यांमध्ये चांदीसारखे दिसणारे पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, जोडवी, पैंजण, हळदी- कुंकवाच्या डब्या, तबक यांचा समावेश आहे. तर सोन्याच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये मणी मंगळसूत्र, नथ, कानातील दागिने दानपेटीत आढळून आले आहेत. सोन्या-चांदीसारख्या दिसणाऱ्या वस्तू अधिक आवश्यक नसल्यामुळे त्यांचे मोजमाप होत नाही. परंतु त्या जतन करून ठेवल्या जातात. सध्या समितीकडे नकली सोने- चांदीच्या पोतेभर वस्तू साठल्या आहेत.



दरम्यान, भाविकांनी श्रद्धेने देवाला काय अर्पण करावे हा त्यांच्या भावनेचा विषय आहे. पण सोने समजून दुसरी नकली वस्तू कोणी विक्री करत असेल तर भाविकांनी काळजी घ्यावी किंवा पावती घ्यावी जेणे करून फसवणूक होणार नाही, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे