पंढरपूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानतर्फे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच संवर्धन होण्यासाठी, या दोन्ही मूर्तींना वज्रलेप करण्यास विधी आणि न्याय विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या आषाढी एकादशीआधी मुर्तींना वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपुरातील सावळ्या विठुरायाची मूर्तीही ही अनेक शतकांपूर्वीची आहे. ही मूर्ती वालुकामय प्रकारातील दगडा पासून साकारण्यात आलेली आहे. यापूर्वी दररोज विठुरायाच्या अनेक महापूजा होत होत्या. तसंच देवाचं दर्शन हे पदस्पर्श असल्याने भाविकांच्या हाताचा स्पर्श हा देवाच्या पायाला सातत्यानं होत आहे. त्यामुळं या मूर्तींची झीज होत असल्याची बाब समोर येत आहे. याच धर्तीवर मूर्तीचं संवर्धन होण्यासाठी त्यांना दर पाच वर्षांनी  वज्रलेप करणं आवश्यक आहे.


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे एक ठराव पाठवून वज्रलेप करण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार समितीला विधी व न्याय विभागाने वज्रलेप करण्यासाठी मान्यता दिली आहे. पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या  सल्ल्याने येत्या आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींवर हा वज्रलेप होऊ शकतो. सध्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्यानं वज्रलेप प्रक्रिया करणं या काळामध्ये सहज सोपं होऊ शकतं.


 


यापूर्वीच्या काही प्रक्रिया.... 


१९८८ साली पहिल्यांदा मुर्ती संवर्धनासाठी इपॉक्सी लेप दिला. यानंतर २००५ आणि नंतर २०१२ साली शेवटचा वज्रलेप दिला. २०१२ साली सिलीकॉन ( वॉकर बी एस २९०) हा रासायनिक लेप दिला होता. २०१२ साली मुर्तीवर लेपन करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला होता. दर पाच वर्षांनी हा लेप देण्याचे पुरातत्व विभागाने सुचवलं आहे.