Vitthal temple | पंढरीच्या विठ्ठल मंदिराला मिळणार पुरातन रूप
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला मिळणार 700 वर्षापूर्वीचं रुप, मंदिराचं रुपडं पालटणार
सचिन कसबे झी 24 तास पंढरपूर : दरवर्षी लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. येत्या काळात भाविकांना विठूरायाचं आगळवेगळं मंदिर पाहता येणारंय. या मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप दिलं जाणारंय. गेल्या दोन वर्षांपासून पुरातत्व विभाग त्यावर काम करतंय. चौदाव्या शतकातील विठूमंदिर साकारताना त्यात वाढती गर्दी, संभाव्य धोके आणि अपघात यांचा विचार करून मंदिराची रचना केली जाणार आहे. (Pandharpur Vitthal temple will get an ancient look the temple will be built in linear stone)
मंदिराला मूळ रूप देण्यासाठी आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. विठूमाऊलीचं नवं मंदिर नेमकं कसं असेल, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. या निर्णयामुळे पंढरीच्या विठ्ठल मंदिराला मिळणार पुरातन रूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे भाविकांना 700 वर्षांपूर्वीचं मंदिर पाहता येणार आहे. मंदिराची रेखीव दगडात उभारणी केली जाणार आहे.
कसं असेल विठूरायाचं मंदिर
14 व्या शतकाप्रमाणे रेखीव दगडात मंदिराची बांधणी केली जाणार. मंदिराला देण्यात आलेले घातक रंग, सिंमेटचं बांधकाम, चकचकीत फरशा काढण्यात येतील. नामदेव पायरीपासून ते गाभाऱ्यापर्यंत सर्व बदल केले जाणार आहेत. मंदिराचं एकूण बांधकाम हे 12 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. या सर्व कामासाठी 42 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
आता लवकरच पुरातत्व विभाग आणि मंदिराच्या पुढील बैठकीत पक्का आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणारंय. या कामामुळे मंदिराचं आयुष्य वाढेल शिवाय भक्तांना चौदाव्या शतकातील मंदिराची अनुभूतीही मिळेल.