Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?
शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे.
अतीष भोईर, झी मीडिया, कल्याण : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 40 आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीला (Guwahati) गेले आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना (Shivsena) फुटली, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवा सत्ता संर्षण सुरु झाला. 40 आमदार सोबत घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आपलीच असल्याचा दावा करत आहेत. तर, उद्धव ठाकरे देखील शिवसेनेवर आपलेच वर्चस्व असल्याचे सांगत आहेत. शिवसेना कुणाची हा वाद आता थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे. आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. डोंबिवलीतील (Dombivali) वाडकर कुटूंबियांची (Pandurang Wadkar) आपल्या मुलीचे नाव "शिवसेना " असे ठेवले आहे.
शिवसेना कोणाची हे येत्या काही दिवसांनी स्पष्ट होईल. मात्र, डोंबिवलीतील एका कुटुंबाने आपल्या मुलीचं नाव चक्क " शिवसेना ठेवलं आहे. पांडुरंग आणि नीलम वाडकर या दाम्पत्याच्या घरात शिवसेना जन्माला आली. याची माहिती होताच वाडकर कुटूंबियांना अनेक जण फोन करून त्यांच्या मुलीची आणि त्यांची विचारपूस करत आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील किये गावात एका चिमुकलीचा जन्म झाला. या मुलीचे नाव शिवसेना असे ठेवण्यात आले आहे. वाडकर यांनी आपल्या मुलीचे नाव शिवसेना का ठेवले या मागे देखील एक रंजक कहाणी आहे.
शिवसेनेवर नितांत प्रेम आणि कट्टर कार्यकर्ता असलेल्या पांढुरंग च्या स्वप्नात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले. त्यांनी तुझ्या घरात शिवसेना आल्याचं त्यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या एका दिवसांने पांढुरंग आणि नीलम यांना कन्या रत्न झाले. मात्र यावेळी पांढुरंग यांना पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलीचे नाव "शिवसेना"ठेवायचा निर्णय घेतला.
पांडुरंग यांनी पत्नी नीलमला मुलीचे नाव शिवसेना ठेवावे असे सांगितले. तिने देखील त्याला होकार दिला. पांडुरंग यांनी मोठ्या थाटात मुलीचा नामकरण सोहळा साजरा केला. यावेळी त्यांनी आपल्या चिमुकलीचे नाव "शिवसेना"ठेवले.
सध्या सुरू असलेल्या राजकारणाने दुःख होतं, मात्र मुलीचं नाव शिवसेना ठेवल्या पासून घरात सुख नांदत असल्याचं पांडुरंग यांनी सांगितले. येत्या 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी स्मृतिस्थळी जाऊन त्याठिकाणी महाड येथे बाळासाहेबांचे मंदिर बांधण्याची घोषणा करणार असल्याचेही वाडकर यांनी सांगितले.