अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून लांब असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परदेशवारी झाल्यावर परत आल्यावर, कोरोना संकट दूर झाल्यावर, जनजीव सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक फेसबुक पोस्ट द्वारे बऱ्याच कालावधी नंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावे लागणार आहे. तेव्हा त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे. 



विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यानंतर पंकजा मुंडे पक्षात फारशा सक्रीय दिसल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी १२ डिसेंबरला पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शन केलं. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेही उपस्थित होते. याच कार्यक्रमातून खडसेंनी भाजपवर थेट टीका केली होती. एकनाथ खडसेंबरोबरच पंकजा मुंडेदेखील पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती.


भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या राज्याच्या कार्यकारिणीमध्येही पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलं नाही. पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे, तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.