बीड / मुंबई : OBC RESERVATION : ओबीसींचं राजकीय आरक्षण संपण्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केलाय. 26 जूनला राज्य़भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. तसंच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका होऊ देणार नाही, न्यायालयात दाद मागू असंही पंकजा मुंडेंनी (pankaja munde) सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. 


पंकजा मुंडेंचा सरकारवर आरोप


भाजप सरकार सत्तेत असताना निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. 
अध्यादेश काढले. पण या सरकारची मानसिकता तशी नाही. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. 


तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही


इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही, राज्य सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे. आता जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या ठाकरे सरकारसमोर आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.