Gopinath Munde Death Anniversary : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा येत्या 3 जून रोजी दहावा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. यंदा गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे. येत्या 4 जूनला लोकसभेची मतमोजणी असल्याने आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा, असंही त्यांनी म्हटलं आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाबद्दल आवाहन केले आहे. या व्हिडीओत पंकजा मुंडे म्हणाल्या, "दरवर्षी 3 जून हा दिवस येतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान..आपल्यातून गेले 3 जून यादिवशी..माझा पिता हरवला, तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर, माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम केलं." 


"आज दहा वर्षे झाली त्यांना जाऊन, पण तरीही तुम्ही न चुकता 3 जूनला गोपीनाथ गडावर येता. यावेळेस एक योगायोग आलेला आहे तो म्हणजे 3 जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे आणि 4 जूनला लोकसभेची काऊंटिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, काऊंटिंग एजंटला 3 जून रोजी संध्याकाळीच बीडला जावे लागते. कारण पहाटे उठूनच त्यांना काऊंटिंगसाठी जावे लागते. मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे. आपली सगळ्यांची इच्छा असून देखील आपल्या सर्वांना यायचं असून देखील ही तळमळ मी समजू शकते. म्हणून मीच तुमची ही अडचण दूर करायचं ठरवलं आहे.



मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका


त्यामुळे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की, आपण जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा. आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल. 4 जूनला मुंडे साहेबांच्या विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करुया. यावेळेस आपण नाही आलात याविषयी मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका. 


कृपया गोपीनाथ गडावर येऊ नये


आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगले समाजोपयोगी कार्यक्रम करु, त्यावेळी फार मोठया संख्येने आपण उपस्थित रहा. दरवर्षीप्रमाणे आमचं किर्तन असतं, भोजन असतं ते आम्ही यावर्षी रद्द केलेलं आहे. आपली अडचण टाळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील माझ्या समस्त लोकांना विनंती करते की, यावेळेस 3 जूनला आपण कृपया गोपीनाथ गडावर येऊ नये. ही विनंती आपण नक्की मान्य कराल आणि माझ्या या विनंतीचा मान राखाल. एवढीच आपल्याकडून अपेक्षा करते", असे पंकजा मुंडेंनी यात म्हटले आहे.