लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर आपली भूमिका मांडणार आहेत. त्या नेमकं काय करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय... आपण भाजपमध्ये नाराज नाही. मात्र पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं सांगतानाच 'मोठा नाही पण छोटा भूकंप मात्र नक्की होईल', असं सांगून पंकजा मुंडेंनी खळबळ उडवून दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे होणाऱ्या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार,या कार्यक्रमाला भाजपमधून कोण कोण येणार हा अजून सस्पेन्स आहे, सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गोपीनाथगड येथे सकाळी ११.०० वाजता पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या परिवारासह उपस्थित राहतील. भाजपच्या नेत्यांसोबत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात होईल. त्याअगोदर या ठिकाणी आयोजित महाआरोग्य शिबिराची पाहणी त्या मान्यवरांसह करतील. प्रास्ताविक खासदार प्रीतम मुंडे या करतील. त्यानंतर प्रमुख पाहुणे बोलतील आणि शेवटी पंकजा मुंडे या आपली भूमिका मांडतील.


चंद्रकांत पाटीलही राहणार उपस्थित


दरम्यान, पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरील मेळाव्यात सारं काही स्पष्ट करतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपणदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. तसंच खडसेंची भूमिका पक्षानं जाणून घेतली असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय.