नांदेड : जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही असं जाहीर वचन राज्याच्या ग्रामीण विकास मत्री पंकजा मुंडेंनी धनगर समाजाला दिलंय. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथं सध्या खंडोबाची यात्रा सुरू आहे. त्या ठिकाणी आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, असा घरचा अहेरदेखील त्यांनी यावेळी दिला. 


'तुम्ही माझा घोंगडी आणि काठी देऊन सत्कार केला. घोंगडी म्हणजे माया, घोंगडी म्हणजे ऊब... हातामध्ये दिलेली काठी ही तुमच्या शक्तीचं प्रतिक आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही...' असं आश्वासनच पंकजा मुंडे यांनी अतिउत्साहाच्या भरात धनगर समाजाला दिलंय.