मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांना खुलं आव्हान दिल्याने आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलं, अशी खोचक टीका परमबीर सिंह यांनी केली होती. तर अनिल देशमुखांनी देखील परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले होते. मात्र या प्रकरणात काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण आणखी पेटल्याने नेमका कट कोण रचतंय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमबीर सिंहांची भूमिका


मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरित्या बोललो नाही. मला जे सांगायचं होतं ते मी न्यायालयात सांगितलं. मात्र, अनिल देशमुख यांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख नार्को चाचणीसाठी तयार असतील तर माझीही तयारी आहे. त्यातून सगळंच सत्य समोर येईल, असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या बदल्यात महाविकास आघाडीसाठी 400 कोटी रुपये कमावण्याचं आश्वासन दिलं होतं, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांच्या  कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता राजकारण देखील आणखी पेटताना दिसतंय.


मनसुख हिरेनची हत्या प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या याचे मास्टरमाईंड परमबीर सिंह होते, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. तर रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात देखील अनेक वाद समोर आले होते. सायबर डीसीपी रश्मी करंधीकर यांच्यावर फडणवीस यांना रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात बोलावण्याचा जबरदस्त दबाव होता, असा आरोप देखील करण्यात आला होता. त्यावेळी डीसीपी करंधीकर यांना फडणवीस यांना समन्स न पाठवता त्यांना प्रश्नावली पाठवली होती. त्यामुळे राजकीय वादात आता भ्रष्ट अधिकाऱ्याचे समर्थन होतंय का? असा सवाल देखील विचारला जात आहे.


दरम्यान, अँटिलिया प्रकरणामुळे देखील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनिल देशमुख यांना मोठ्या प्रमाणावर चालवलेल्या कटाची माहिती का नव्हती? असा सवाल विरोधकांनी विचारला होता. तसेच सचिन वाझेच्या कार्यशैलीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यातील हा वाद आगामी काळात आणखी उग्र होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकींच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय? असा सवाल विचारला जात आहे.