गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : सापाच्या भीतीने भल्या भल्यांची बोलती बंद होते. सापाच्या दंशामुळे अनेकदा लोकांची प्रकृती बिघडते. पण साप पाहताच क्षणी अनेकांचा भीतीने अर्धा जीव निघून जातो. असाच काहीसा प्रकार परभणीत घडलाय. परभणीत एका आठ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची सगळीकडे चर्चा सुरु आहे. सापाच्या चावण्याच्या भीतीनेच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तब्बल चार तासांनी मुलाचा मृतदेह सापडल्याने कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साप दिसल्याने पळत सुटलेल्या लहानग्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. चार तासांनी गावकऱ्यांना मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे. रोशन प्रल्हाद शिंदे असे आठ वर्षीय मृत बालकाचे नाव आहे. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे गावावरही शोककळा पसरली आहे.


परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा शिवारात ही धक्कादायक घटना घडली. पंगत जेवून पाऊल वाटेने गावाकडे निघालेल्या तिघा मुलांना घराकडे परतत असताना साप दिसला होता. साप पाहून तिघांचीही घाबरगुंडी उडाली. सापला पाहिल्याने रोशन चांगलाच घाबरला होता. काही कळायच्या आत रोशनसोबत त्याचे मित्र भरधाव पळत सुटले. रोशनचे मित्र दुसरीकडे पळाले. मात्र धावता धावता रोहन एका कठडे नसलेल्या विहरित जाऊन पडला. रोहनच्या मित्र मात्र यातून बचावले. त्यांनी तात्काळ गावातल्या लोकांना या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती दिली..


गावकऱ्यांनी तात्काळ त्या विहिरीकडे धाव घेतली आणि पाण्यात उतरुन रोहनचा शोध सुरु केला. संध्याकाळ पर्यंत रोहनचा काहीच शोध लागत नव्हता. शेवटी अंधार पडल्यानंतर सगळ्यांचा आशा देखील मावळल्या होत्या. मात्र तब्बल चार तासांच्या शोधानंतर रोहनचा मृतदेह गावकऱ्यांच्या हाती लागला. या घटनेमुळे रोहनच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. रोहनचे मित्र दुसरीकडे धावल्यामुळे ते सुखरुप बचावले आहेत.