मुलांच्या भविष्यासाठी पालकांचा नदीतून जीवघेणा प्रवास
प्रशासनाला तातडीने व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश
सोनू भिडे, नाशिक-
तरुण पिढी हि भारताचे भविष्य असल्याच म्हटलं जात. मात्र या तरुण पिढीला शाळेत जाण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नसल्याच उघड झाल आहे. आदिवासी भागातील मुलाचं भविष्य घडविण्यासाठी पालक मुलांना खांद्यावर बसवून तर कुणी पातेल्यात बसवून नदी पार करून देत आहेत.
आदिवासी भाग हा तसा दुर्लक्षितच.... या भागात मुलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध होत नाही. गेल्या पंधरा दिवसात उत्तर महाराष्ट्रात आदिवासी भागात खराब रस्ता असल्याने दोन महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. तसेच नदीवर पूल नसल्याने पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत होती. याच वृत्त झी २४ तासन प्रसारित केल होत.
शाळेत जाण्यासाठी करावी लागेत कसरत....
नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यापासून सततचा पाऊस सुरु आहे. या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरण १०० टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी नालेही ओसंडून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील देवपाडा येथून दमणगंगा नदी वाहते. या नदीला सुद्धा अतिवृष्टीमुळे पूर आला होता.
देवपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १ ली ते ४ थी पर्यंतची मुल शिक्षण घेत असतात. या शाळेची पटसंख्या २६ असून सर्व विद्यार्थी गावातीलच आहेत. आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो. या २६ विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची शेती मानकापूर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील मोहपाडा येथे आहे. त्यामुळे हे चार विद्यार्थ्यांना दमणगंगा नदीचे पात्र ओलांडून शाळेत यावे लागते.
नदीपात्र मुलांना पार करणे शक्य नसल्याने पालक आपल्या चिमुकल्याना खांद्यावर घेऊन तर ज्याला खांद्यावर शक्य नाही ते पालक एका पातेल्यात मुलांना बसवून नदी पात्र पार करून देत आहेत. नदीपात्र पार करत असताना पालकांना पाण्यात वाहून जाण्याची भीती सुद्धा असते मात्र मुलांच्या भविष्याकरिता पालक रोज हा जीवघेणा प्रवास करत आहेत.
गावकऱ्यांची नदी पात्रावर पुलाची मागणी
दमणगंगा नदी पात्रावर पूल बांधला गेल्यास मुलांना शाळेत जाणे सोप होणार आहे. तसेच मानकापूर ते पेठ हा ३० किलोमीटरचा रस्ता आहे. यासाठी कोहोर, करंजाळी, पेठ असा प्रवास करावा लागतो. मात्र दमण गंगा नदीवर पूल बांधल्यास हे अंतर निम्म्याने कमी होणार आहे.
खासदार शिंदे यांनी घेतली दखल
देवपाडा येथील पालकांचे मुलांसाठी जीवघेणी कसरतीचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते. हे वृत्त बघितल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रशासनाला घटनास्थळी भेट देऊन तातडीची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या होते. शुक्रवारी (५ ऑगस्ट) ला मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडचणी समजवून घेत लवकरात लवकर कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न करण्यात आला.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट ला साजरा करणार आहोत. मात्र ७५ वर्षानंतरही ग्रामीण आणि आदिवासी भागातील परिस्थिती बदलली नाही. दुर्गम परिसरात साध्या मुलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत याची खंत आदिवासी भागात आजही पदोपदी जाणवते.