संसदेतील घुसखोरी प्रकरण; महाराष्ट्र ATSकडून एक संशयित ताब्यात
महाराष्ट्र ATSकडून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर ही कारवाई करण्यात आलेय. गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय आहे.
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत प्रवेश केला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी कामकाज सुरु असताना उडी मारली. त्यामुळे लोकसभेच्या कामकाजावेळी एकच गोंधळ उडाला. कामकाज सुरु असताना हे दोन्ही अज्ञात अचानक घुसल्याने एकच खळबळ उडाली. आरोपींच्या बुटात गॅस पाईपसारखी वस्तू होती. मात्र, खासदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं आणि सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब या दोघांना अटक केली. या प्रकरणात आता महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई केली आहे.
संसदेतील घुसखोरी प्रकरणात महाराष्ट्र ATSकडून एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप या संशयित व्यक्तीवर केला जात आहे. संसदेतील घुसखोरीनंतर ATS अलर्ट मोडवर आली आहे.
नागपूर अधिवेशनात आता प्रत्येक आमदाराला दोनच पास दिले जाणार
लोकसभेतील तरूणांच्या घुसखोरीनंतर नागपूर अधिवेशनात आता प्रत्येक आमदाराला दोनच पास दिले जाणार आहेत. तर विधानपरिषदेत प्रेक्षक गॅलरीचे पास पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. लोकसभेतल्या प्रकारानंतर राज्य विधीमंडळानं हा निर्णय घेतलाय. अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात याविषयीची माहिती दिली.
संसदेत घुसखोरी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन
संसदेत घुसखोरी करण्याच्या प्रकरणातलं महाराष्ट्र कनेक्शन आता समोर आल आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. अमोल मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे.. संसदेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उडी मारली. तर, दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. स्मोक कँडलमधून त्यांनी धूर सोडला... त्यामध्ये अमोलचा समावेश होता. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अमोल शिंदेला तत्काळ अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही खासदारांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते अशी माहिती समजतेय. मात्र या सर्व प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे आजच संसदेवर झालेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी लोकसभेची सुरक्षा भेदली जाणं ही घटना धक्कादायक मानली जातेय. खासदारांनीही या घटनेनंतर सुरक्षेवर चिंता व्यक्त केली.