ठाणे : ठाण्याजवळचा पारसिक बोगदा धोकादायक असल्याचा रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे या बोगद्याच्या वरून जाणारी चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांनी ठाणे महापालिकेला केलं आहे. या बोगद्यावरून गेल्या काही वर्षांपासून केवळ दुचाकीची वाहतूक करण्यास परवानगी होती. मात्र काही दिवसांपूर्वी चारचाकी वाहतुकीवरील बंदी हटवण्यात आली आणि या बोगद्यावरील पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र त्यामुळे पुन्हा या बोगद्याबाबत धोका वाढल्याचं रेल्वे पोलिसांचं म्हणणं आहे. या बोगद्यातून दररोज लाखो प्रवासी लोकल आणि ट्रेनमधून प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. झी २४ तासनं याआधी अनेकदा बोगदा असुरक्षित असल्याचं वृत्त दाखवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीही ढासळेल अशी चिंताजनक स्थिती पारसिक बोगद्याची असल्याचं जाणकार सांगतात. ठाण्यातल्या कळवा आणि मुंब्रामधल्या पारसिक रेल्वे बोगद्याची अवस्था आधीच खराब आहे. त्यात या बोगद्यावर घरं आहेत, सोबतच आजूबाजूला साचलेला कचराही आहे. हे कमी म्हणून की काय अनेक वर्षं या बोगद्याची डागडुजीच केलेली नाही. त्यामुळे कमकुवत झालेला हा बोगदा कधीही ढासळू शकतो.


अनेक उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा असलेल्या पारसिक बोगद्याची डागडुजी युद्धपातळीवर करण्याची गरज आहे. सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना या बोगद्यात घडलेली नाही. मात्र एखादा अनुचित प्रकार घडल्यावरच रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार का हाच खरा प्रश्न आहे. 


मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण जलद मार्गावर हा १.३ किलोमीटर अंतराचा पारसिक बोगदा आहे. १८७३ मध्ये पारसिक हिलमध्ये हा बोगदा बांधण्यात आला होता. जलद लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक हा बोगद्यामधून होते. वर्षभर या बोगद्यात गळती सुरु असते. त्यामुळे बोगदा हा भुसभुशीत होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.