मुंबई : महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. तर कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राजधानी मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिलाय.. खरंच पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरु झालीये. मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. देशात सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्रात होते आहे.. कोरोनाचा कहर वाढल्यानं राज्यातील नाशिक, मालेगाव आणि औरंगाबाद शहरात सध्या अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी 7 या वेळेतच दुकानं सुरू आहेत. विवाह समारंभांवर तसंच धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.


राजधानी मुंबईत देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. असंच सुरू राहिलं तर पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


तूर्तास मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे. मात्र मुंबईकर नियमांचं पालन करणार नसतील तर लॉकडाऊन करावं लागेल, असा कडक इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.


राज्यात कोरोनाचं संकट वाढत असल्यानं काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं आरोग्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. पण परिस्थिती अजून तरी नियंत्रणात आहे. नागरिकांची बेफिकिरी अशीच कायम राहिली तर मात्र पुन्हा लॉकडाऊन करावंच लागेल... तेव्हा सावध राहा, सतर्क राहा आणि काळजी घ्या.