लातूर : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते पाशा पटेल यांची एका पत्रकाराला बोलताना चांगलीच जीभ घसरली. लातूरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यापूर्वी एका पत्रकाराने भाजप सरकारने शेतक-यांची कशी वाट लावली असा सवाल विचारला. त्यावर पाशा पटेल भडकले. त्यांनी चक्क अर्वाच्च भाषेत पत्रकाराला शिवीगाळ केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय खालच्या भाषेत अक्षरश: शिव्यांची लाखोळीच पाशा पटेल यांनी त्या पत्रकाराला वाहिली. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असणा-या पत्रकाराने आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद केला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.


कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असलेले पाशा पटेल हे शेतकरी नेते म्हणून परिचित आहेत. अशात त्यांनी अशा पद्धतीने शिवीगाळ केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. दरम्याने या प्रकरणी त्या पत्रकाराने पत्रकार परिषदेत शिवीगाळ का केली असा सवाल केल्यानंतर आपणास पत्रकाराची ओळखच नसल्याची सारवासारव त्यांनी केली. याप्रकरणी पत्रकाराने लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात एक अर्ज दिलाय. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.


याप्रकरणी आम्ही पाशा पटेल यांची बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीनंच मला आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे माझा राग अनावर झाल्याचं पाशा पटेल म्हणालेत.