ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा साठी आज मतदान पार पडत आहेत. 15 जागांसाठी आज मतदान होत असून यापूर्वीच पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत उर्वरित दहा जागेसाठी आज मतदान होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीला मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  पण एका मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क अँम्ब्युलन्समध्ये येऊन मतदान केलं.


नेमकी घटना काय?
कळंब तालुक्यातील सौंदना आंबा गावचे पालकर मधुकर भाऊराव हे विविध कार्यकारी सोसायटीतून मतदार आहेत. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 


मधूकर यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग सर्वच जण कामाला लागले. पालकर यांना अतिदक्षता विभागातून चक्क रुग्णवाहिकेतून मतदानाच्या ठिकाणी आणण्यात  आलं .तोंडाला ऑक्सीजन  मास्क  लावलेल्या अवस्थेत पालकर यांनी आपला मतदानाचा हक्क  बजावला. मतदानानंतर पालकर यांना पुढील उपचारासाठी लातूर इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा
उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिलं जातं. यासाठी आज मतदान सुरू आहे. महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी ही थेट निवडणूक रंगतेय. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 


तर दुसऱ्या बाजूला भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे .उद्या मतमोजणी आहे यानंतरच उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक कोणाच्या ताब्यात जाईल हे स्पष्ट होणार आहे