विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: आजवर तुम्ही अनेक वाढदिवस पाहिले असतील. पण, औरंगाबादमध्ये साजरा झाला असा हटके वाढदिवस मात्र पाहिला नसेल. पाहिला असेलच तर, तो अपवाद. औरंगाबादमध्ये साजऱ्या झालेल्या वाढदिवसात नेहमीच्या वाढदिवसाप्रमाणे फुगे, संगीत इतकेच नव्हे तर केकही होता. पण, विशेष असे की, हा वाढदिवस कोणा एखाद्या व्यक्तिचा नव्हता तर, तो एका झाडाचा होता. होय, औरंगाबादमध्ये चक्क एका झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


झाडाच्या नावानं केकही कापला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औऱंगाबादच्या पिर बाजार परिसरात झाडांना सजवण्यात आले. त्यांना फुगे बांधण्यात आले. परिसर स्वच्छ करण्यात आला. कारण या झाडांना लावून आता वर्ष झालंय.  या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी हा सगळा प्रकार परिसरातील नागरिकांनी केला. झाडांसमोर रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्या लहानगण्यांनी परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या नावानं केकही कापला. तर  वाजंत्रीच्या तालावर ठेकासुद्धा धरला. तब्बल वर्षभरापूर्वी या परिसरात ही १०० झाडं लावण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला. 


झाडांच्या संगोपणासाठी चिमूकल्यांचाही हातभार


परिसरातील मोठ्यांसोबत लहानग्यांनी ही झाडं जगवण्यासाठी मेहनत घेतली. आणि त्यामुळंच हा वाढदिवस साजरा करतांन त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात. मात्र त्यांना जपण्याकडं दुर्लक्षच होत असतं,  मात्र या ठिकाणी झाडं लावण्याचही आली आणि ती जगवण्यातही आली, अजूनही बराच पल्ला गाठायचाय. मात्र, एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद झाडांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पहायला मिळाला.