मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : सध्या कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होते, असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिकन खाणंच सोडून दिलं आहे. खोट्या मेसेजमुळे कोंबडी पालनाचा धंदा बसला असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, असा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी सध्या चिकन खाणंच सोडून दिलंय. त्यामुळं चिकन खरेदीला कुणी दुकानात फिरकत नाहीये. त्यामुळे कुक्कुट पालनाचा जोडधंदा करणाऱ्या उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय.


कुक्कुटपालक शेतकरी आणि चिकन विक्रेते यांच्यासह हॉटेल व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय. कोरोना व्हायरसच्या भीतीने अगदी पट्टीचे खवय्ये देखील चिकनचे पदार्थ ऑर्डर करत नाहीयेत. असे खोटे मेसेज पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली जात आहे.


कोरोना विषाणूचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात कोरोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे भारतीय चिकन आणि अंडी खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत, असं केंद्रीय पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता बिनधास्त चिकनवर ताव मारायला हरकत नाही. 


दरम्यान, विविध रिपोर्टनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतात चिकनचा खप कमी झाला आहे. भारतात १० ते १५ टक्के चिकनची मागणी कमी झाल्याची माहिती आहे. गेल्या वेळी सार्स व्हायरसमुळे चिकनच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे आता कोरोनामुळे देखील चिकन प्रेमींनी चिकनकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे.


सध्याच्या वैज्ञानिक संशोधनात असे दिसून येत आहे की, हा विषाणू अजूनही चीनमध्ये एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरत आहे. पण चिकनमध्ये अद्याप विषाणूचा संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हटलं आहे.