अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  अमरावतीत (Amravati Accident) मोठा अपघात झाला आहे. पिकअपच्या (Pickup) अपघातात गाडीतील 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर 10 जणांपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाकडून अपघातातील मृतांची आणि जखमींबाबतची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (pickup vehicle accident in amravati melghat 4 businessmen died and 10 passengers seriously injured)


नक्की काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पिकअप वाहनात अनेक व्यापारी प्रवास करत होते. हे व्यापारी धारणी तालुक्यातील सुसरदा येथील आठवडी बाजार आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. हे सर्व अकोटच्या दिशेने राणीगाव मार्गे जात होते. मात्र या दरम्यान घात झाला. संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडल्याचं समजतंय. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील 2 व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. 


तर अपघातानंतर गाडीतील इतरांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा आणखी दोघांना मृत असल्याचं घोषित केलं. त्यामुळे मृतांचा आकडा हा 4 वर जाऊन पोहचला आहे. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला जखमींवर आवश्यक ते उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत आणि सर्व जखमी अकोट जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्हा हादरलाय.


मृतांची नावं 


सय्यद समशेर, केशव शिवाजी बनसोड आणि नागेश (चालक)  अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून मृतांची आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.