गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : हज यात्रेवरुन (Hijjah) परतणाऱ्या एका यात्रेकरुचा विमानतळावरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदिनाहून (Madina) नागपूरला (Nagpur) येणाऱ्या यात्रेकरुचा मंगळवारी मृत्यू झाला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फ्लायनोस विमान कंपनीच्या फ्लाइटमध्ये चढण्यासाठी ते रांगेत उभे असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने या यात्रेकरुचे निधन झाले. या घटनेमुळे सकाळी नऊच्या सुमारास विमानाने दीड तास उशिराने उड्डाण केले. हाजी शेख वजीर शेख सुलेमान (वय 62, रा. मंगळूरपीर जि. वाशिम) असे मृत यात्रेकरुचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लिम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी अनेक यात्रेकरु राज्यातून जातात. वाशिम जिल्ह्यातील शेलुवाडा येथील हाजी शेख वजीर शेख सुलेमान हे देखील त्यांच्या कुटुंबासह हज यात्रेसाठी गेले होते. हज यात्रेवरुन परतताना मदिना येथेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हाजी शेख वजीर शेख सुलेमान आपल्या पत्नीसह हज यात्रा करून मदिना येथून नागपूरसाठी विमानाने परत येत असताना विमान तळावरच  हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर मदिना येथे दफनविधी करण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. हाजी शेख वजीर शेख सुलेमान यांच्या मागे पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे.


हाजी शेख वजीर शेख सुलेमान यांची पत्नी नसीम बानोही त्याच विमानातून नागपूरला येणार होत्या, मात्र या घटनेनंतर त्यांनी प्रवास रद्द केला. सामान विमानात चढवल्यामुळे ते विमानानं नागपूर विमानतळावर पोहोचले. नातेवाईकही त्यांचे सामान घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. मात्र विमानतळ प्राधिकरणाने नातेवाईकांना सामान देण्यास नकार दिला. आता नसीम बानो यांचे सामान नागपूरला पोहोचल्यानंतरच त्यांच्याकडे दिले जाणार आहे. दुसरीकडे, हाजी शेख वजीर शेख सुलेमान यांचा मृतदेह मदिना येथे दफन करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या पत्नी नसीम बानो यांच्या राहण्याचीही व्यवस्था हज कमिटीने केली आहे. 25 जुलैरोजी त्यांच्यासाठी विमान पोहोचणार आहे.