कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड: स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


विकासाचं मॉडेल असलेलं पिंपरी चिंचवड केंद्र सरकारच्या स्वच्छ शहरांच्या यादीत 9 व्या क्रमांकावरून 72 व्या क्रमांकावर फेकलं गेलं.  ही घसरण झाल्यावर स्वच्छता मोहिमेची सदिच्छा दूत असलेल्या अंजली भागवतचे स्वच्छतेसाठी आवाहन करणारे बोर्ड पालिकेच्या प्रवेशद्वारावर असे अडगळीत पडले होते. आता तिला शहरातल्या चौका चौकात फ्लेक्सवर स्थान मिळालंय.
आगामी वर्षात होणाऱ्या सर्वेक्षणात शहराचं स्थान पुन्हा वरच्या क्रमांकावर यावं यासाठी महापालिकेने कंबर कसलीय. महापालिकेने इतर ही उपाय योजना आखलेल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य, विविध सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यात आलाय. स्वच्छ शहरांच्या यादीत शहराला स्थान मिळावं यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण त्याच बरोबर प्रशासनाने स्पर्धेपुरते गांभीर्य ठेऊ नये हे ही तितकंच खरं.