पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याने, भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तर या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकवटली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हा राजीनामा दिला आहे.


राजीनामा आयुक्तांकडे देणं अपेक्षित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांकडे देणं अपेक्षित असतं. मात्र हे दबावतंत्रासाठी राजीनामास्त्र वापरल्याची चर्चा आहे. याबाबत महापौरांना विचारले असता, शहराध्यक्षांनी त्यांना बोलूच दिलं नाही.


शहराध्यक्ष आणि लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक सीमा सावळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्थायीचं अध्यक्षपद आमदार महेश लांडगे गटाला मिळणं अपेक्षित होतं. 


सभागृह नेत्यांकडे राजीनामे


मात्र इच्छुकांची गर्दी पाहता पक्षश्रेष्ठींनी जगताप गटाच्या ममता कुलकर्णी यांच्याकडे स्थायीच्या चाव्या सोपवल्या. यामुळेच नाराज लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष जगतापांकडे तर स्थायीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचे सभागृह नेत्यांकडे राजीनामे सोपवले.


पक्षाच्या हितासाठी माझ्यासह सर्वांचे राजीनामे तयार असून, आमच्यासाठी राजीनामे ही दुय्यम आहेत. असं म्हणत जगताप यांनी राजीनामास्त्रावर पडदा टाकला.


फायदा घेण्यासाठी मात्र विरोधक एकवटले


भाजपमधील या गटबाजीचा फायदा घेण्यासाठी मात्र विरोधक एकवटलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्यावर मोरेश्वर शेंडगे यांचा स्थायीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. सध्या परिस्थिती अनुकूल असल्यानं, अध्यक्ष आमचाच असेल असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.


पक्षीय बलाबल


स्थायी समितीत भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेनेचा 1 तर अपक्ष 1, असं सध्याचं पक्षीय बलाबल आहे. 


भाजपच्या 10 सदस्यांमध्ये नाराज आमदार लांडगे गट आणि अध्यक्ष पद डावलण्यात आलेले असे पाच सदस्य आहेत. हे पाच, राष्ट्रवादी चार आणि शिवसेनेचा एक असे मिळून 10 सदस्यांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीकडून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.