Mumbai Local Mega Block Sunday:  मुंबईकरांनो रविवारी लोकल ट्रेनचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक मुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी तसंच सिग्नल यंत्रणेसंदर्भात काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही फेऱ्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक 


मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी सकाळी  11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मुलुंडपुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. 


हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ दरम्यान एकही लोकल धावणार नाही


हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकदरम्यान मानखुर्द ते नेरुळ स्थानकांदरम्यानची सर्व लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी 10 ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


उद्या पश्चिम रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर असणार आहे. ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विलेपार्ले व राम मंदिर स्थानकात लोकल उपलब्ध राहणार नाहीत. बोरिवली ते गोरेगावदरम्यान काही लोकलफेऱ्या रद्द असणार आहेत.


जळगाव-मनमाड रेल्वे मार्गावर 14 आणि 15 ऑगस्टला मेगाब्लॉक


जळगाव-मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी 14 आणि 15 ऑगस्टला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणा-या 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.