मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाकडे अनेकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यातही ऑफबिट आणि विलेज टुरिझमचा ट्रेंड चांगलाच स्थिरावू लागला आहे. एखाद्या ठिकाणची लहान खेडी, तेथील राहणीमान या साऱ्याचा अनुभव घेण्याकडेच पर्यटकांचा कल दिसून येत आहे. फिरस्तीवेड्या अशाच मंडळींचा प्राधान्यक्रम लक्षात घेता आता काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. त्यातीलच एक पाऊल म्हणजे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबद्दलची माहिती दिली. मंत्रालयात यासंदर्भातील बैठक पार पडली. ज्यासाठी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, पर्यटन संचालक दिलीप गावडे असे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


'ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिला जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे. यातून मराठवाड्यातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येईल', असं सत्तार म्हणाले.


 


मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. पर्यटन विभागाच्या सहयोगातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळं सुनिश्चित करुन त्यांचा विकास करणं, तिथं पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत निधीची उपलब्धता करुन देणं याबाबतही यावेळी चर्चा झाल्याची माहिती समोर आली.