मुंबई : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांना सुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे आणि बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप लीडरच्या माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणी करत असताना नाव, सध्या रहात असलेला पत्ता, कुठे जाणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर यांची नोंद करावी. आणि त्यांना बसनी प्रवास करायचा आहे का रेल्वेनी यांचीही नोंद त्यात करावी. जाणाऱ्या लोकांची संख्या जर एक हजार असेल तर रेल्वेने प्रवासाची व्यवस्था आणि 25 संख्या असेल तर बसने प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे तपासणी प्रमाणापत्र सोबत देण्यात येईल.


राज्यांतर्गत अडकलेले लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र जर एखाद्या शहरात किंवा भागात कंटामेंन्ट झोन, हॉटस्पॉट जाहीर केला असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी परवानगी नाही. 


प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर यासाठी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून शासनामार्फत व्यवस्था केली जाईल. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, गर्दी करू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.