पुणे :  महाराष्ट्र राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त करण्यात आले असून ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आज सकाळपासून दोन वाजेपर्यंत आठ हजार ७११ किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला, केलाय. दरम्यान, प्लास्टिक बंदीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.


पुण्यात या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून ८,७११ किलो आणि थर्माकोल ७५ किलो जप्त करण्यात आला आहे. येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार आहे.  


प्लास्टिक बंदीचे स्वागत आहे. मात्र, सर्व व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. यासाठी राज्य सरकारने पर्याय देण्याची गरज होती. यावर राज्य सरकारकडून निश्चित विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली.