प्लास्टीक बंदीची पहिली विकेट या शहरात?
या शहरात झाली पहिली कारवाई
मुंबई : प्लास्टिकला कडाडून विरोध करत सरकारने महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली. मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक बंद केलं आहे. या प्लास्टिक बंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्यांदाचा प्लास्टिक आठळल्यास 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यसाठी सर्वांनी जवळ असलेलं प्लास्टीक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आहावन करण्यात आलं. असं सगळं असलं तरीही प्लास्टिक बंदीची पहिला विकेट गेली आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
नाशिक शहरात प्लास्टिक बंदी विरोधात पहिला दंड आकारला आहे. हा दंड पाच हजार रुपयांचा असून या व्यक्तीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. नाशिकमधील जुनी पंडित कॉलनीतील रहिवाशावर ही कारवाई झाली आहे. या पावतीत प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्याबाबत ही कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं मुंबईतील विविध भागात ३७ संकलन केंद्र सुरु केले आहेत. ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रातही प्लास्टिक गोळा केलं जात आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत पालिकेच्या संकलन केंद्रात १४५ मेट्रिक टन प्लास्टिक गोळा झाला आहे. प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यासाठी पालिकेनं २५० अधिकारी नेमले असून त्यांना दंडात्मक कारवाईचे आधिकार देण्यात आलेत. प्लास्टिक बंदिसाठी राज्यात पालिका क्षेत्रात आयुक्त तर ग्रामपंयाचत क्षेत्रात ग्रामसेवकांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.