`खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..`, मोदींऐवजी `या` नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोला
Raksha Khadse In PM Modi Cabinet: महाराष्ट्रामधून सहा खासदरांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही सावेश असल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाष्य केलं आहे.
Raksha Khadse In PM Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबरच एकूण 64 मंत्र्यांनी शपथ घेतली असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात रावेरच्या महिला खासदार रक्षा खडसेंचाही समावेश आहे. सासरे एकनाथ खडसेंनी बंडखोरी करुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरही भाजपाशी एकनिष्ठ राहिल्याचं बक्षीस रक्षा खडसेंना मंत्रीपदाच्या रुपात मिळाल्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असं असतानाच ठाकरे गटाने मात्र रक्षा खडसेंना मिळालेलं मंत्रीपद हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समविचारी मंत्र्यांना केंद्रातील नेतृत्वाने दिलेला धक्का असल्याचं म्हटलं आहे.
ठाकरे गटाची टीका
मोदींच्या शपथविधीवर ठाकरे गटाने 'सामना'तील अग्रलेखातून भाष्य केलं आहे. याच लेखामध्ये रक्षा खडसेंना मिळालेल्या मंत्रीपदाचाही उल्लेख करण्यात आला आहे. "मोदी पुन्हा पंतप्रधान झाले व त्यांच्याबरोबर भाजप आणि घटक पक्षांतील काही सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनहरलाल खट्टर, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे अशी नेहमीची नावे आहेत. शिंदे गटाचे प्रताप जाधव यांचे घोडे गंगेत न्हाले. रामदास आठवले हे आहेतच. महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली," असं ठाकरे गटाने लेखाच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
फडणवीसांवर साधला निशाणा
रक्षा खडसेंना मिळालेल्या मंत्रीपदावरुन ठाकरे गटाने, "खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने दिलेली चपराक आहे व त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतलेले दिसतात. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. ते या वेळी घडले नाही," असा टोला महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना लगावण्यात आला आहे.
नक्की वाचा >> 'मोदींनी शपथ सोहळ्याचा थाट केला जणू काही..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, '..तरी स्वतःचे झाकून..'
कोथळीच्या सरपंच ते केंद्रीय मंत्री
रक्षा खडसे यांना मंत्रीपद देण्यामागे उत्तर महाराष्ट्र, महिला, ओबीसी असे अनेक घटक असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर खडसे कुटुंबाचा दबदबा राहिलेला आहे. कंप्युटर सायन्समधील पदवीधर तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजरातील या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या 37 वर्षीय रक्षा खडसे या मोदींच्या मंत्रीमंडळातील तरुण खासदारांपैकी एक आहेत. रावेर मतदारसंघातून यंदा त्यांना सलग तिसऱ्यांदा भाजपाने तिकीट दिलं. रक्षा खडसेंचा जन्म 13 मे 1987 चा आहे.