PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेकदा अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या काका-पुतण्याच्या भेटींवरुन राज्यात उलट सुलट चर्चा सुरु असतानाच राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. शरद पवारांचा पाठिंबा मिळवला तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी अजित पवार गटाला दिली आहे, असा दावा वड्डेटीवार यांनी केला आहे. यासाठी पवारांचं मन वळवण्याच्या उद्देशाने अजित पवार त्यांची वारंवार भेट घेत असल्याचा दावाही वड्डेटीवार यांनी केला आहे. याचसंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शरद पवारांना ऑफर देण्याइतके अजित पवार कधी मोठे झाले? असा उलट प्रश्न विचारला आहे.


ज्युनिअर लोक पवारसाहेबांना काय ऑफर देणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना वड्डेटीवार यांनी केलेल्या ऑफरच्या दाव्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी, "अजित पवार एवढे मोठे नेते नाहीत की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतील. अजित पवारांना शरद पवारांनी घडवलं आहे. शरद पवारांना अजित पवारांनी घडवलेलं नाही. 60 ते 70 वर्षांहून अधिक काळ पवार हे संसदीय राजकारणामध्ये आहेत. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेकदा देशातील केंद्रीय मंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे. त्यांची उंची फार अधिक आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारखे ज्युनिअर लोक पवारसाहेबांना काय ऑफर देणार? असं कधी होतं का राजकारणामध्ये?" असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.


शरद पवार भाजपाबरोबर हातमिळवणी करणार नाहीत


"केंद्रीय स्तरावरील ऑफर शरद पवारांना देण्याइतके अजित पवार कधी मोठे झाले? अजित पवार आणि शरद पवार हे नक्कीच कौटुंबिक नात्याने बांधलेले आहेत. त्यांचं कुटुंब मोठं आहे. त्यांच्या काही संस्था एकत्र आहेत. मी जे काही पवारसाहेबांना ओळखतो. ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांच्या हयातीमध्ये हातमिळवणी करतील असं मला वाटतं नाही. ते करणार नाहीत असं काही याचा मला विश्वास आहे," असंही संजय राऊत म्हणाले.


नक्की वाचा >> 'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट


एखाद्या दुसऱ्या भेटीतून नको तो अर्थ काढू नये


"शरद पवार नव्याने पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. काल सोलापूरला होते, आता संभाजीनगरला आहेत. एका जिद्दीने ते लढत आहेत. त्यात हे सगळे सोडून गेले. त्यांचा काही संबंध नाही असं काही त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या कृतीतून दिसत आहे. एखाद्या दुसऱ्या भेटीतून असा अर्थ काढणं बरोबर नाही. कालच माझं आणि त्यांचं फोनवरुन बोलणं झालं. खास करुन मुंबईत 31 आणि 1 तारखेला 'इंडिया अलायन्स'संदर्भातील बैठक आहे तिच्या तयारीबद्दल आमची चर्चा झाली," असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.