पुणे : पुणे मेट्रोसह (Puen Metro) पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यानंतर मोदी यांचं  एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी मराठी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आदींचा उल्लेख करत मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.  देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात पुण्याचे योगदान मोठं आहे. रामभाऊ म्हाळगी पुण्यतिथी आहे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचंही स्मरण होत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. हा पुतळा तरुण आणि नवीन पिढीसाठी प्रेरणा ठरणारा आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. आज उद्घाटनाला मला बोलावण्यात आलं. पूर्वी भूमिपूजन होत असे तेव्हा लोकार्पण कधी  होणार याची शाश्वती नव्हती, असं म्हणत मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता टोला लगावला. 


हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हा संदेश यातून गेला आहे, पुणेकरांचे अभिनंदन! दोन्ही महापौरांचे अभिनंदन आणि पुढील कामांसाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. 


पुणे मेट्रो प्रकल्पामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेल, ट्रॅफिक जाम मधून मुक्ती देईल आणि प्रदुषण मुक्ता वाहतूक मिळेल, असं सांगत पंतप्रधानांनी समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. 


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीत जोमाने पाठपुरावा केला असं सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशात शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. 2030 पर्यंत शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या वर जाईल, अशा वेळी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आव्हानात्मक असणार आहे, सार्वजनिक वाहतूक हा त्यातील एक महत्वाचा पर्याय ठरणार आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 


पुण्यातील नागरिकांनी मेट्रोतून प्रवासाची सवय लावून घेणे आवश्यक आहे,  तुम्ही कितीही मोठे असाल, मेट्रोतून प्रवास करा असा माझा सुज्ञ पुणेकरांना आग्रह आहे असा आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं. 


स्मार्ट, प्रदूषण मुक्त वाहतुकीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पुणेकरांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. जेणेकरून आम्हाला नदीचं महत्व कळेल असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी पुणेकरांना केलं. 


विकास प्रकल्प राबवताना गती आणि व्याप्ती महत्वाची असते. पूर्वी प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागायचा. परिणामी तो प्रकल्प पूर्ण होईस्तोवर कालबाह्य व्हायचा. यावर उत्तर म्हणून आम्ही पी एम गती शक्ती अभियान सुरू केल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.