नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयांवर पत्र पाठवत राहीले. मात्र, २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या कुठल्याच पत्राला उत्तर दिलं नाही. पण आता ४ वर्षांत प्रथमच पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी एक संदेश आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ पासून अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना १५ पत्र लिहिली आणि त्यांच्या पत्रात मुख्य मुद्दा हा लोकपाल कायदा हाच होता. मात्र, या चार वर्षांत एकाही पत्राला उत्तर देण्याचं मोदी सरकारला सुचलं नाही.


लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. यासोबतच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. आठवडाभर चाललेल्या आंदोलनाला संपवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पुढाकार घ्यावा लागला होता. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं होतं.


आपल्या मागण्यांवर केंद्र सरकार तात्काळ सकारात्मक पाऊल उचलेल असं आश्वासन मिळाल्यानंतर अण्णांनी आंदोलन थांबवलं होतं. मात्र, ३० मार्च पासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकारकडून कुठलाच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा अण्णांनी सरकारला पत्र लिहिलं. या पत्रात अण्णांनी सरकारला ऑक्टोबरमध्ये पुन्हा आंदोलन करण्याचं अल्टिमेटम दिलं.


अण्णांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर पंतप्रधान कार्यलयाकडून त्यांना एक पत्र आलं. पीएमओने उत्तर देत म्हटलं की, अण्णा हजारेंना भेटण्यासाठी पीएमओचे सचिव स्तराचे अधिकारी लवकरच राळेगणसिद्धीला पोहोचणार आहेत.


अण्णा हजारेंनी शुक्रवारी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पारनेर तालुक्यात तरुणांना मार्गदर्शन करताना याचा खुलासा केला आहे.