PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!
Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.
PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर (Narendra Modi In Pune) येणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा पुणेकरांसाठी महत्त्वाचा असेल. विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटनक्रम आणि मेट्रोला (Pune Metro) हिरवा कंदिल देखील मोदींच्या हस्ते दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा (Lokmanya tilak award 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. त्याचा वितरण सोहळा देखील पार पडणार आहे.
दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल. तत्पुर्वी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात (Dagdusheth Ganapati Temple) श्रींची पूजा करणार आहेत. त्यानंतर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास मेट्रो प्रकल्पाच्या नव्या दोन मार्गिकांच्या सेवेचं पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
पुणेकरांना काय मिळणार?
पंतप्रधान मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्याचबरोबर ते वेस्ट टू एनर्जी मशिचे उद्घाटन करणार आहेत. 300 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाणार आहे. एवढंच नाही तर, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांमध्ये फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल रुग्णालय स्थानकांचा समावेश आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरांचा देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची 1190, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना अधिक सोई सुविधा मिळतील.
पुणे पोलिसांकडून रंगीत तालीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) असल्याने ते त्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गावर पोलिसांकडून आज रंगीत तालीम करण्यात आली. पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे दगडूशेठ हलवाई गणपती, तिथून एस पी कॉलेज ग्राउंड आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ग्राउंड असा पंतप्रधानांचा प्रवास असणार आहे. यावेळी पंतप्रधान प्रवास करणार असलेल्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याची तयारी म्हणून पुणे पोलिसांकडून रिहर्सल घेण्यात आली. दरम्यान या रिहर्सल मुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पुणेकरांना त्याचा त्रास सोसावा लागला.
पुण्यातील हे मार्ग राहणार बंद
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक.
पंतप्रधानांच्या दौऱ्याचा फटका सामान्य पुणेकरांना आजपासूनच बसायला सुरुवात झालीये. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. उद्या सकाळी ६ ते दुपारी ३ दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे विविध ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडून पुणेकरांसाठी पर्यायी मार्ग दिले नसल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम हे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असून पर्यायी मार्ग न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.