प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, अलिबाग : एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेटचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्‍याची माहिती देखील मिळाली आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. अलिबागच्‍या किनारपटटी भागातील बंगले भाडयाने घेवून अशा प्रकारे देहव्‍यवसाय आणि अंमली पदार्थांचा व्‍यापार चालत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांनीच मोठया खुबीने या क्षेत्रात काम करणाऱ्या राखी नोटानी आणि रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांचे मोबाईल नंबर मिळवले. त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी ठराविक रक्‍कम त्‍यांच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍यास सांगितली. 


त्‍यानंतर या दोघींनी त्‍यांच्‍या संपर्कात असलेल्‍या मुलींची नाव कळवून सौदा निश्चित केला. त्‍याप्रमाणे काल रात्रीसाठी दोन बंगले ऑनलाईन बुक करण्‍यात आले. तेथे मग पार्टीचे आयोजन करण्‍यात आले. तेथे बनावट ग्राहक पाठवून त्‍याच्‍याकडे पैसेही देण्‍यात आले. यानंतर या रॅकेटचा भंडाफोड केला .


महिला पोलिसांनी राखी नोटानी आणि  रंजिता सिंग यांची अंगझडती घेतली असता त्‍यांच्‍याकडे 26 ग्रॅम कोकेन आढळून आले. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक, सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग अशी या गुन्‍हयातील आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याविरोधात अनैतिक व्‍यापार प्रतिबंधक अधिनियम तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल करून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.


आज या सर्व आरोपींसह देहव्‍यापारासाठी आलेल्‍या 7 मुलींना अलिबाग न्‍यायालयासमोर हजर केल्‍यानंतर या मुलींना सुधारगृहात पाठवण्‍यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख, सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, पोलीस उपनिरीक्षक बुरुंगळे आणि 25 पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली .