राष्ट्रवादीच्या २ कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी संशयित ताब्यात
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. जामखेडमध्ये शनिवारी योगेश आणि राकेश राळेभात या दोन भावांची हत्या करण्यात आली. मार्केट यार्ड परिसरात संध्याकाळी पावणेसात वाजता दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी हा गोळीबार केला. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा जिल्हा सरचिटणीस होता. या घटनेचं वृत्त समजताच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेले होते.
पण तिथे त्यांना मृतांच्या नातेवाईक आणि समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे राम शिंदे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मागच्या दाराने खाजगी वाहनानं माघारी परतावं लागलं. जिल्ह्यातली १५ दिवसांतली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. नगर जिल्ह्यातल्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय.