ज्या पोलीस ठाण्याबाहेर पतीनं चहा विकला, त्याच पोलीस खात्यात पत्नीची निवड; तिच्या जिद्दीला सलाम!
Police Bharti 2023 : मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 7,076 जागांसाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यामध्ये अनेकांना यश आले तर काहींना अपयश. मात्र बीडच्या केजमधील गृहिणी असलेल्या महिलेने उत्तुंग यष मिळवलं आहे.
Police Bharti 2023 : सध्या राज्यभरात पोलीस भरतीची (Police Bharti) जोरदार चर्चा सुरुय. मुंबई पोलीस दलाच्या (Mumbai Police) भरतीसाठी परीक्षा पार पडल्या असून नुकताच त्याचा निकाल लागला आहे. अनेकांच्या मेहनतीला या भरतीमध्ये यश आले आहे. तर काहीच्या पदरी निराशा पडली आहे. पण केजमधल्या (Kej) माधवी पाचपिंडे-वाघचौरे या महिलेने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवलं आहे. कुटुंबियांच्या पाठिंब्याने माधवी पाचपिंडे-वाघचौरे यांनी उत्तुंग झेप घेतली आहे.
मुंबई पोलीस दलात दोन पदांवर निवड
महत्त्वाची बाब म्हणजे माधवी यांचे पती बालाजी पाचपिंडे हे रस्त्यावर चहाचे दुकान चालवतात. हातावर पोट असणाऱ्या माधवी यांची मुंबई पोलीस दलात दोन पदांवर निवड झाली आहे. यामुळे सध्या पाचपिंडे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना झालाय. संसाराला हातभार लावण्यासाठी माधवी या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होत्या. त्यातून वेळ काढून माधवी यांनी अभ्यास करत हे यश मिळवलं आहे.
शिकवण्या घेऊन कुटुंबाला लावला हातभार
केज येथील महात्मा जोतिबा फुलेनगरमध्ये पाचपिंडे कुटुंबिय एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहतात. तर माधवी यांचे पती बालाजी पाचपिंडे हे केज येथील केज-बीड रोडवर पोलीस ठाण्याच्या शेजारील रस्त्यावर चहाची टपरी चालवून त्यांच्या कुटुंबाचे पोट भरतात. दिवसाकाठी बालाजी यांना 600 ते 1 हजार रुपये मिळतात आणि त्यातूनच त्यांचे घर चालत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. त्यानंतर भाड्याच्या एका छोट्या खोलीत राहूनच माधवी यांनी पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवण्या घेऊन कुटुंबाला हातभार लावण्यास सुरुवात केली.
घरच्यांनी दिली मोलाची साथ
कुटुंबाची मदत करत असतानाच माधवी यांनी वेळ काढून पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली होती. त्यासाठी माधवी यांनी धावणे व व्यायामाचा सराव सुरु केला. यासोबत लेखी परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान याचाही अभ्यास केला. यामध्ये माधवी यांचे पती बालाजी पाचपिंडे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. तर माधवीची मोठी नणंद रुक्मिणी पाचपिंडे यांनीही त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पोलिसांनीही केले कौतुक
याचे यश अखेर माधवी पाचपिंडे यांना मिळाले. अखेर माधवी यांची मुंबई पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली आहे. त्यामुळे लवकरच त्या प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत. या बातमीनंतर केज पोलीस ठाण्यानेही माधवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. माधवी यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दोघांचा सत्कार केला.